सरकार स्थापन करू शकत नाही; शिवसेनेला शुभेच्छा- भाजपा
- CT INDIA NEWS
- Nov 10, 2019
- 1 min read

सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपाच्या कोअर कमिटी बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या कोअर कमिटीच्या नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाले. राज्यपालांची भेट घेऊन आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही, अशी माहिती राज्यपालांना दिल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. निकाल लागून दोन आठवडे उलटल्यानंतरही सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानं सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता. अखेर शनिवारी (९ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं होत. त्यानंतर भाजपानं सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या होत्या. रविवारी भाजपाच्या कोअर कमिटीच्या दोन बैठका झाल्या. ४ वाजता झालेल्या बैठकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याची माहिती दिली.चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यातील जनतेने भाजपा-शिवसेना भाजपा युतीला जनादेश दिला होता. सोबत काम करण्यासाठी हा कौल होता. मात्र, शिवसेनेनं भाजपासोबत सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आहे. आम्हाला जनादेशाचा अपमान करायचा नव्हता. त्यामुळं आम्ही राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याचं सांगितलं आहे,” असं पाटील म्हणाले. शिवसेनेसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, “शिवसेनेनं जनादेशाचा अपमान केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाच्या शिवसेनेला शुभेच्छा आहेत, असं पाटील यांनी सांगितलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे नेतेही उपस्थित होते.
Comments