top of page

हेडिंग - राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा जळगाव विभागातर्फे वेबिनार संपन्न

  • Writer: CT India News
    CT India News
  • Dec 24, 2020
  • 2 min read

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागातर्फे वेबिनार संपन्न

प्रतिनिधी - श्री योगेश चौधरी जळगाव - 8668472226


जळगाव, दि. 24 - ऑनलाईन खरेदीच्या जमान्यात ग्राहकांनी वस्तुची किंमत, दर्जा, उपयोगिता आदिंबाबत सजग राहूनच वस्तुची खरेदी करावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखेमार्फत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री.अभिजीत राऊत बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. संजय बोरवाल, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, पोलीस उप अधीक्षक अरुण धनावडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त य. को. बेंडकुळे, वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक आयुक्त बी. जी. जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेबिनारमध्ये जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी ऑनलाइन सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांनी ऑनलाईन वस्तुंची विक्री करणाऱ्या संस्थांबाबत अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. आपणास आवश्यक असलेल्या वस्तुबाबत परिपूर्ण माहिती करुन घेतल्याशिवाय वस्तुची खरेदी करु नये. विशेषत: आर्थिक व्यवहार करतांना ग्राहकांनी खुप काळजी घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन खरेदीत आपल्या एटीएमचा पीन गोपनीय राहील, ओटीपी कोणालाही देवू नये, रक्कमेची नोंद करतांना काळजी घ्यावी, अनावश्यक ॲप डाऊनलोड करु नये, लॉटरी लागल्याचा इमेल प्राप्त झाला असल्यास त्याबाबत खात्री करावी. जेणेकरुन स्वत:ची व इतरांचीही फसवणूक आपण टाळू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकारी श्री. सुर्यवंशी यांनी ग्राहकाला माहिती मिळविण्याचा, सुरक्षिततेचा व वस्तु निवडण्याचा हक्क असल्याचे सांगून नागरिकांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले. सहाय्यक पुरवठा अधिकारी श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय ग्राहक दिनाची माहिती दिली. उपस्थितांचे आभार ए. जी. जोशी यांनी मानले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, कृषि विभागाचे एस. आर. पाटील, भारत पेट्रोलियमचे क्षेत्रीय अधिकारी स्वप्नील श्रीवास्तव, विद्युत विभागाचे व्ही. डी. पाटील यांच्यासह पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments


bottom of page