*अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा*
नरखेड येथील एका ६ वर्षीय अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. ही हृदयद्रावक घटना ३० जुलै २०२३ रोजी घडली होती. पीडित बालक आणि त्याची ५ वर्षांची लहान बहीण घरासमोरील बागेत खेळत असताना आरोपी योगेश उर्फ राहुल वासुदेव रेवतकर (वय २२ वर्षे, राहणार नरखेड) याने बालकाला १० रुपयांचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने बालकाला आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नरखेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सारिका गुरूकर यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि सखोलपणे केला. त्यांनी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस. एच. गवालानी यांच्या न्यायालयात पार पडली. ५ मे २०२६ रोजी न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब तपासून आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जर आरोपीने दंडाची रक्कम भरली नाही, तर त्याला अतिरिक्त ६ महिने सश्रम कारावास भोगावा लागणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील श्रीमती कल्पना पांडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. या कायदेशीर प्रक्रियेत आणि आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पराग पोटे, पोलीस निरीक्षक विशाल गिरी, प्रभारी पोलीस अधिकारी श्रीमती मोकाशे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशांत नांदगाये, पोलीस अंमलदार रामदास कोराम आणि कोर्ट पैरवी अंमलदार हिमांशु वंजारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून परिसरात न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
