अड्याळ पोलिसांची अवैध हातभट्टीवर मोठी कारवाई;
१.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त..
भंडारा/अड्याळ:
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा खोलापुर रिटी गोसे बँक वॉटर परिसरात पोलिसांनी अवैध हातभट्टीवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १,४१,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, अड्याळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आंबुडारे आणि त्यांच्या पथकाने खोलापुर रिटी येथील गोसे बँक वॉटर परिसरात छापा टाकला. यावेळी रमित उदाराम सेलोटे (वय २८, रा. जामगाव, ता. पवनी) हा इसम अवैध दारू गाळताना मिळून आला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत खालील वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत:
सडवा मोहपास: ६५० किलो (१३ प्लास्टिक पिशव्यांमध्ये), किंमत १,३०,००० रुपये.
हातभट्टी दारू: अंदाजे २५ लिटर (३ प्लास्टिक डब्यांमध्ये), किंमत ५,००० रुपये.
साहित्य: ४ निळे प्लास्टिक ड्रम, २ लोखंडी ड्रम आणि २ लोखंडी पिंपे.
अशा प्रकारे एकूण १,४१,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूाबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे आणि स.पो.नि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. सिंधि मेश्राम आणि पो.हवा. आंबुडारे यांनी केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास अड्याळ पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
