जनगणनेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक; भाजप शहर उपाध्यक्ष विवेक नरवाडे यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
महागांव:
सध्या डिजिटल युगात फसवणुकीचे नवनवे मार्ग शोधले जात असून, आता चक्क जनगणनेच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक आणि वैयक्तिक फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष विवेक राजेंद्र नरवाडे यांनी नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली गोपनीय माहिती न देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
गोपनीय माहिती शेअर करू नका!
विवेक नरवाडे यांनी नागरिकांना आवाहन करताना स्पष्ट केले आहे की, डिजिटल माध्यमातून किंवा फोन कॉलद्वारे जनगणनेची माहिती गोळा करण्याच्या बहाण्याने काही भामटे नागरिकांना टार्गेट करत आहेत
अशा वेळी कोणत्याही व्यक्तीला खालील माहिती अजिबात सांगू नये:
आपले बँक खाते क्रमांक (Bank Account Numbers)
[आधार कार्ड तपशील ओमिट केले]
मोबाईल क्रमांक आणि मुख्यत्वे मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP)
एक छोटासा ओटीपी किंवा गोपनीय माहिती तुमच्या बँक खात्यातील कष्टाचा पैसा लंपास करण्यास कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी कमालीची सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
ओळखपत्राची खात्री करा
जर कोणी व्यक्ती प्रत्यक्ष घरी येऊन जनगणनेची माहिती मागत असेल, तर सर्वप्रथम संबंधित कर्मचाऱ्याचे अधिकृत ओळखपत्र (ID Card) तपासून घ्यावे. प्रशासनाकडून अशा कामांसाठी नियुक्त केलेल्या व्यक्तींकडे अधिकृत ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. ओळखपत्राची पूर्ण खात्री झाल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करू नका किंवा माहिती देऊ नका, असेही नरवाडे यांनीम्हटले आहे.
“तुमची सतर्कताच तुम्हाला फसवणुकीपासून वाचवू शकते. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांशी किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.”
— विवेक राजेंद्र नरवाडे (शहर उपाध्यक्ष, भाजप, महागाव)
