*विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) मोहिमेला वेग; मोहगाव येथे तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांच्या उपस्थितीत विशेष जनजागृती, तीन दिवसीय विशेष कॅम्पद्वारे मतदार यादी अद्ययावत करण्यावर भर*
====================
*10 ते 12 जुलैदरम्यान तहसील कार्यालय व पंचायत समिती सभागृहात विशेष कॅम्प; 75 मतदान केंद्रांतील EF डिजिटायझेशनचे उद्दिष्ट, प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूक करण्यासाठी प्रशासनाची कंबर कसली*
====================
गोरेगाव, प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision–SIR 2026) अंतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीरहित करण्यासाठी गोरेगाव तालुका प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून, या मोहिमेला आता अधिक वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोहगाव येथे गोरेगावच्या तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी विशेष भेट देत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मतदार नोंदणी प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश व्हावा आणि माहितीचे अचूक डिजिटायझेशन व्हावे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी सांगितले की, मतदार यादी ही लोकशाही व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा आधार असून तिची शुद्धता आणि अचूकता राखणे ही प्रत्येक संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही आणि अपात्र नावे राहणार नाहीत, यासाठी सखोल पडताळणी करून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
याच मोहिमेचा एक भाग म्हणून 10 जुलै ते 12 जुलै 2026 या कालावधीत तहसील कार्यालय, गोरेगाव तसेच पंचायत समिती सभागृह, गोरेगाव येथे तीन दिवसीय विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या सलग तीन दिवसांत सकाळपासून सायंकाळपर्यंत चालणाऱ्या या कॅम्पमध्ये Enumeration Form (EF) चे डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघातील गोरेगाव तहसील अंतर्गत असलेल्या 75 मतदान केंद्रांकरिता हा विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरील EF ची संगणकीकृत नोंद पूर्ण करून मतदार यादीतील माहिती अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या विशेष मोहिमेत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक, तसेच अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाचा आढावा घेणार आहेत. प्रत्येक EF वेळेत आणि अचूकपणे डिजिटायझेशन होण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन व समन्वयाची व्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदारांची नावे, पत्ता, वय, छायाचित्र तसेच इतर आवश्यक तपशीलांची सखोल पडताळणी करून ती ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदविण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे आगामी निवडणुकांमध्ये त्रुटीरहित मतदार यादी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, मतदान प्रक्रियेची विश्वासार्हता अधिक मजबूत होणार आहे.
तहसील प्रशासनाने सर्व BLO, पर्यवेक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना नियोजित वेळेत कॅम्पमध्ये उपस्थित राहून EF डिजिटायझेशनचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कामाचा दर्जा, माहितीची अचूकता आणि वेळेचे नियोजन यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाने मतदारांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत मतदार नोंदणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी अचूक मतदार यादी अत्यावश्यक असल्याने या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला सर्व स्तरातून सहकार्य मिळणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या तीन दिवसीय विशेष कॅम्पमुळे गोरेगाव तालुक्यातील मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळणार असून, निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत EF डिजिटायझेशनचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गोरेगांव तालुका प्रतिनिधी महादेव शेन्डे
