वडोदा पोलिसांची धडक कारवाई: ८ गोवंश जनावरांची सुटका, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!
वडोदा (कामठी):
वडोदा पोलिसांनी गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करत एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अत्यंत गुप्त आणि खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचून ८ गोवंश जनावरांची क्रूरतेच्या विळख्यातून सुटका केली. या धडक कारवाईत पोलिसांनी ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
२६ जुलै २०२६ रोजी वडोदा पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, काही इसम गोवंश जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करत आहेत. या माहितीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी वडोदा भामेवाडा पानंदन ते आसलवाडा रोडवर नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयास्पद ‘बोलेरो पिकअप’ (क्रमांक MH-40/DD 1810) वाहनाला थांबवून तपासणी करण्यात आली.
पोलिसांनी वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यात अत्यंत हृदयद्रावक दृश्य समोर आले. वाहनामध्ये ८ गोवंश जनावरांना चारापाण्याची कोणतीही सोय न करता, अत्यंत कमी जागेत कोंबून ठेवले होते. त्यांचे शिंग आणि पाय आखूड दोरीने अत्यंत निर्दयपणे बांधण्यात आले होते. पोलिसांनी तात्काळ सर्व जनावरांची सुटका केली.
आरोपी अटकेत, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी वाहन चालक अजय नरेश रोकडे (वय २८, रा. वडोदा) आणि वाहन मालक सचिन शिवराम मरकाम (वय ४३, रा. वडोदा, ता. कामठी, जि. नागपूर) यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या पथकाने ५ लाख रुपये किमतीचे वाहन आणि १ लाख २० हजार रुपये किमतीची ८ जनावरे, असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० च्या कलम ११(१) (ड), (ई), (फ) सहकलम ५ (अ), ९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध धंद्यांविरुद्ध आणि मुक्या प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध वडोदा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि केलेली ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून वडोदा पोलिसांचे जोरदार कौतुक होत आहे.
ही कारवाही वडोदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रणयसिंह बनाफर, दीपक दरोडे,विपीन गायधने, पोलीस शिपाई अतुल निंबार्ते,नितीन साळवे यांनी केली आहे.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
