कळमेश्वर शहरात बनावट नोटा चालवण्याचा प्रयत्न फसला; 500 रुपयांच्या 7 नोटा जप्त, तिघांना पोलीस कोठडी
कळमेश्वर : कळमेश्वर शहरातील बाजार चौक परिसरातील एका वाईन शॉपमध्ये दारू खरेदी करताना 500 रुपयांच्या बनावट नोटा चालवण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी तत्परता दाखवत मध्य प्रदेशातील दोन मजुरांसह त्यांच्या ठेकेदाराला अटक केली असून त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 7 बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 23/08/2026 रोजी रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी दोन मजूर दारू खरेदीसाठी बाजार चौक येथील ईखार वाईन शॉपमध्ये आले होते. त्यांनी देशी दारू खरेदी करताना दुकानातील व्यवस्थापकास 500 रुपयांची नोट दिली. व्यवस्थापक नरेंद्र शंकरराव वालदे (वय 49 वर्षे, रा. कोलबा स्वामी देवस्थान, कळमेश्वर) यांना सदर नोटेचा संशय आल्याने त्यांनी अस्सल 500 रुपयांच्या नोटेशी पडताळणी केली. नोटेमध्ये तफावत असल्याचे स्पष्ट होताच व्यवस्थापकांनी तात्काळ कळमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि दोन्ही मजुरांना दुकानातच थांबवून ठेवले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळून 500 रुपयांच्या 7 बनावट नोटा मिळून आल्या. व्यवस्थापक नरेंद्र वालदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दिलीप कुंदीलाल यादव (वय 39 वर्षे, रा. बमनी, जि. मंडला, मध्य प्रदेश) आणि सुनिल अशोक यादव (वय 32 वर्षे, रा. डोरली छत्रपूर, जि. सिवनी, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 786/26, भारतीय न्याय संहिता कलम 179, 180, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला.
तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी या नोटा त्यांचा ठेकेदार परमलाल भबुसिंग मालवी (वय 25 वर्षे, रा. वरोडा, ता. कळमेश्वर) याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ठेकेदार परमलाल यालाही अटक केली. या तिन्ही आरोपींना कळमेश्वर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील चौकशीत परमलाल मालवी याने या नोटा एमआयडीसी कळमेश्वर येथील आकाश निखाडे याने दिल्याचे सांगितले असून पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत नारमोड, पोलीस उपनिरीक्षक मल्हारी डोईफोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत खोब्रागडे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मन्नान नौरंगाबादे, पोलीस शिपाई मनिष सोनोने व राणा ठाकूर यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
