*समस्या व निरीक्षणातून संशोधनाची निर्मिती होते. प्रा. डॉ.दीपक दलाल*
दि. 31/08/2026
अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांचा करिअर कट्टा, यांच्या संयुक्त विद्यमाने अविष्कार संशोधन कार्यशाळा शेंदुर्णी महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भैय्यासाहेब श्री स्नेहदीप गरुड यांनी भारताला संशोधनाचा समृद्ध वारसा लाभला आहे तसेच अविष्कार म्हणजे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना देणे होय. समाजाच्या व देशाच्या हितासाठी अविष्कार संशोधन आवश्यक असून त्याचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.बी.शेळके हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सर्वांगीण विकासासाठी संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे असून संशोधन हे अविरत चालणारी प्रक्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संशोधन करीत असतो असे प्रतिपादन केले. कार्यशाळेचे प्रमुख अतिथी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील डॉ. दीपक दलाल यांनी अविष्कार स्पर्धेमधील विद्यापीठाची यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली तसेच संशोधनाची सुरुवात साधनाने नाही तर जिज्ञासेने होते असे प्रतिपादित केले. आजच्या स्पर्धेच्या युगात संशोधनाशिवाय पर्याय नाही विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असणाऱ्या कल्पना या अविष्कार च्या माध्यमातून मांडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी व्हावे असेही आवाहन केले. संशोधनासाठी प्रयोगशाळा असणे गरजेचे नाही तर संशोधनासाठी निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले प्रश्न निर्माण होणे ही संशोधनाची खरी सुरुवात असल्याचे विवेचनही त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यशाळेत अविष्कार संशोधन स्पर्धेतील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रा. शुभम पाटील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर यांनीही विद्यार्थ्यांसमोर आपले संशोधन अनुभव व्यक्त केले व संशोधनासाठी आपल्या परिसरात किंवा जवळपास असणाऱ्या विविध संधी कशा प्राप्त करता येतील याचेही मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी पाचोरा, पारोळा, चाळीसगाव, बोदवड, भडगाव, सोयगाव व शेंदुर्णी अशा विविध महाविद्यालयातून १०० विद्यार्थी व संघ व्यवस्थापक सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यशाळा समन्वयक डॉ. योगिता चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन कु. जागृती गुजर हिने केले तर आभार आयक्यूएसी समन्वयक डॉ. दिनेश पाटील यांनी केले. कु. मानसी चौधरी या विद्यार्थिनींने महाविद्यालयीन गीत सादर केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय भोळे, डॉ. श्याम साळुंखे, प्रा. आप्पा महाजन, डॉ. अमर जावळे तसेच पारोळा या आर. एल. महाविद्यालय पारोळा चे उपप्राचार्य डॉ.अजय पाटील व गरुड महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
