*मारहाण करून मोबाईल हिसकावणारी झारखंडची टोळी जेरबंद
*१० मोबाईल व स्विफ्ट डिझायरसह ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त; उमरखेड डी.बी. पथकाची दमदार कामगिरी*
*उमरखेड | दि. १४ सप्टेंबर २०२६*
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर उभ्या असलेल्या निवृत्त अभियंत्याला मारहाण करून मोबाईल हिसकावून पळणारी झारखंड-बिहारची चोर टोळी उमरखेड पोलिसांनी जेरबंद केली आहे.
फिर्यादी विठ्ठल नागोराव मोहकर (वय ६४, रा. दयानंद कॉलनी, उमरखेड) हे दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता बाजार समितीच्या गेटवर उभे असताना पांढऱ्या स्विफ्ट डिझायरमधून आलेल्या तिघांनी त्यांचे हात पकडून गालावर थापड मारली व खिशातील २० हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल बळजबरीने चोरून नेला होता. याप्रकरणी पो.स्टे. उमरखेड येथे अप. क्र. ८९१/२०२६ कलम ३०९(४), ३(५) भा.न्या.संहिता प्रमाणे गुन्हा दाखल होता.
आठवडी बाजारात वारंवार होणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आरोपींना तात्काळ शोधून काढण्याचे आदेश दिले होते. ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात डी.बी. पथक प्रमुख उपनिरीक्षक शरद लोहकरे यांनी गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचला.
पथकाने आरोपी १) शेख तालीम शेख आयुब (वय २८, रा. डाकबंगला मोतीझरना, जि. साहेबगंज, झारखंड), २) मकसूद आलम इदवाह आलम (वय २१, रा. नासिरगंज, जि. कटिहार, बिहार), ३) वसीम अकरम शेख अब्दुल रज्जाक शेख (वय ३२, रा. तौहीदनगर, आयोध्यानगर, नागपूर) यांना नागपूर-तुळजापूर हायवेवर मार्लेगाव फाटा येथे ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून फिर्यादीच्या मोबाईलसह चोरीचे एकूण १० मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली MH ४९/CS २४८५ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर असा एकूण ६,१६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास डी.बी. पथक प्रमुख शरद लोहकरे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक गुरव कायंदे-पाटील, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ विजय पतंगे, पोहवा अतुल तांगडे, चंदन जाधव, गिरीश बेंद्रे, पोकॉ संघशिल टंभरे, विष्णू राठोड, दिगांबर गिते, निवृत्ती महाळनवर, हनुमंत मुसळे यांनी पार पाडली. याकामी अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि श्रीकांत जिंदमवार व पोहवा विशाल भगत यांनी मदत केली.
*उमरखेड तालुका प्रतिनिधी : बबलू उर्फ मोहम्मद शेख*
संपर्क : 9067934036
