मोवाड-गणेशपूर मार्गावर बेकायदेशीर रेती वाहतूक करणारा १० चाकी टिपर जप्त, चालकाला अटक; २५.३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
नरखेड :
मोवाड ते गणेशपूर मार्गावर विनापरवाना आणि क्षमतेपेक्षा अधिक बेकायदेशीर रेतीची वाहतूक केल्याप्रकरणी नरखेड पोलिसांनी एका १० चाकी टिपरवर कारवाई करत चालकाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी नरखेड पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर होते. त्या दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, या मार्गावरून अवैध रीतीने रेतीची वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मोवाड ते गणेशपूर मार्गावर नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान संशयित १० चाकी टिपर (वाहन क्रमांक : एमएच २९ बीई ०९६६) अडवून तपासणी केली असता, त्यात रेती भरलेली आढळून आली.
वाहनातील रेतीचे अधिकृत वजन केले असता, विनापरवाना ०६ ब्रास रेती भरलेली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वैध परवाना किंवा स्वामित्वधन (रॉयल्टी) पावतीबाबत विचारणा केली असता, चालकाला कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. चौकशीदरम्यान चालकाने आपले नाव नरेंद्र सहदेव देव्हारे (वय ३६ वर्षे, रा. पुसला, ता. वरुड, जि. अमरावती) असे सांगितले. वाहनाच्या मालकीबाबत विचारपूस केली असता, हे वाहन पलास राऊत (रा. ता. वरुड, जि. अमरावती) यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले.
पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून २५ लाख रुपये किमतीचा १० चाकी टिपर आणि ३० हजार रुपये किमतीची ०६ ब्रास रेती, असा एकूण २५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी नरखेड पोलीस ठाण्यात आरोपी चालक नरेंद्र देव्हारे तसेच वाहन मालक पलास राऊत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ४९ तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम ६६(१)/१९२(अ) व २०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
