एक-दोन नव्हे तर तब्बल सहा गावांतील भ्रष्टाचाराच्या तक्रारीं कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे अडचणीत

एक-दोन नव्हे तर तब्बल सहा गावांतील भ्रष्टाचाराच्या तक्रारीं कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे अडचणीत

 

 

यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर

 

 

 

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे 1 ते 4चा प्रस्ताव दाखल, फौजदारी कारवाईचा प्रश्न ऐरणीवर महागाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या विकास कामांमध्ये गंभीर अनियमितता व कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे एक-दोन नव्हे तर तब्बल पाच ते सहा गावांमधील तक्रारी वरिष्ठ स्तरावर पोहोचल्या असून त्यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे 1 ते 4 कारवाई प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.घाणमुख ग्रामपंचायत विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात झालेल्या चौकशीमध्ये सलामे दोषी आढळल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात येत असून त्यांच्यावर वसुलपात्र रक्कम असल्याचेही सांगितले जात आहे. ही रक्कम त्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावी तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपोषणकर्ते राम जाधव यांनी केली आहे.तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, घाणमुख येथे दोन स्वतंत्र चौकशांमध्ये अनियमितता निदर्शनास आल्याचे सांगितले जाते. तसेच आपल्या अधिकृत कार्यक्षेत्राबाहेरील कामे घेणे, ठेकेदारी पद्धतीने हस्तक्षेप करणे, बोगस कागदपत्रांच्या आधारे बिले काढणे असे अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.धारेगाव येथील रस्त्याच्या कामात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या रस्त्याचे फोटो दाखवून बिले काढल्याचा आरोप असून या संदर्भातील पुरावे संबंधित विभागाकडे असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे.वाकोडी येथे बोगस सह्यांच्या आधारे लाखो रुपयांचे बिल काढल्याचा आरोप आहे, तर घोणसरा व इतर गावांमध्येही विकास कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे. या सर्व गावांतील तक्रारी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते.दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप आणि चौकशी अहवाल समोर येत असतानाही अद्याप फौजदारी कारवाई का करण्यात आलेली नाही, हा प्रश्न आता नागरिकांमध्ये जोर धरत आहे. इतके गंभीर आरोप असताना संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का होत नाहीत? शासन अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.तसेच, या कथित भ्रष्टाचारातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमविल्याच्या चर्चा स्थानिक स्तरावर होत असून संबंधित अधिकारी प्रभावाचा वापर करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतील का, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाची प्रतिमा पणाला लागलेली असताना मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणात ठोस आणि पारदर्शक कारवाई करतील की नेहमीप्रमाणे प्रकरण थंडबस्त्यात जाईल, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान, या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, भ्रष्टाचारातून झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित किंवा बडतर्फ करावे, अशी जोरदार मागणी राम जाधव व संबंधित गावांतील ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *