महागाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचे जाळे; चौकशी करून दोषींवर कारवाई करा – विशाल डहाळे

महागाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचे जाळे; चौकशी करून दोषींवर कारवाई करा – विशाल डहाळे

 

 

 

जिल्हा प्रतिनिधी : एस. के. शब्बीर महागाव

 

 

महागाव तालुक्यात गेल्या अडीच वर्षांपासून वाढत चाललेली गुन्हेगारी, अवैध धंदे आणि त्यासंदर्भातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विशाल डहाळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यात चोरी, घरफोड्या, जनावरांची तस्करी, गांजा विक्री, जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या वाढत्या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे डहाळे यांनी म्हटले आहे.

महागाव तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतानाही त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अवैध धंद्यांमुळे युवक वर्ग व्यसनांच्या आहारी जात असून सामाजिक वातावरणही बिघडत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र संबंधित प्रकरणांमध्ये अपेक्षित कारवाई झाली का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे डहाळे यांनी नमूद केले आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली असल्यास त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.दरम्यान, महागाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ए.पी.आय सुनील आंबुरे यांनी अलीकडील काळात अवैध धंद्यांविरोधात मोहीम राबवत विविध ठिकाणी कारवाया केल्या आहेत. या कारवायांमधून अनेक बेकायदेशीर प्रकार समोर आल्याने पूर्वीच्या कालावधीतील परिस्थितीचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.

 

 

महागाव तालुका गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन करणे, मागील अडीच वर्षांतील गुन्हेगारीचा आढावा घेणे, संबंधितांची जबाबदारी निश्चित करणे आणि चौकशी अहवाल सार्वजनिक करणे या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

“महागाव तालुक्यात अवैध धंद्यांवर कायमचा चाप बसणे गरजेचे आहे. कायद्याचा धाक निर्माण झाला तरच सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर पावले उचलावीत,” असे विशाल डहाळे यांनी म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *