मरखेल पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: १ लाख ५७ हजार रुपयांचे ७ महागडे मोबाईल शोधून मालकांना केले सुपूर्द

*मरखेल पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: १ लाख ५७ हजार रुपयांचे ७ महागडे मोबाईल शोधून मालकांना केले सुपूर्द

देगलूर / मरखेल:*

मरखेल पोलीस ठाण्यातील धडाकेबाज पथकाने तांत्रिक तपास आणि आधुनिक यंत्रणेचा वापर करत, हरवलेले ७ महागडे मोबाईल फोन शोधून काढले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत १ लाख ५७ हजार रुपये असून, ते पुन्हा मिळवून दिल्यामुळे मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

तांत्रिक कौशल्याचा अचूक वापर

दिनांक १ जानेवारी २०२६ ते २५ जून २०२६ या कालावधीत नागरिकांचे मोबाईल हरवले होते. या प्रकरणी मरखेल पोलिसांनी ‘केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी प्रणाली’ (CEIR) आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला होता. पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, पोलीस कर्मचारी नारायण यंगाळे आणि संदीप बोदेमवाड यांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या मोबाईलचा माग काढला. विविध कंपन्यांचे ७ मोबाईल फोन हस्तगत करून ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच पोलीस पथकाला तांत्रिक तपास अधिक प्रभावीपणे करता आला, असे मरखेल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी रवी हुंडेकर साहेबयांनी सांगितले.

नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ

महागडे मोबाईल गमावल्यानंतर ते मिळण्याची आशा सोडून दिलेल्या नागरिकांना, पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. “पोलीस यंत्रणेने तांत्रिकदृष्ट्या केलेली ही कारवाई खरंच कौतुकास्पद आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. या यशस्वी मोहिमेमुळे मरखेल पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. प्रतिनिधी . श्री दिपक पाटील बेंम्बरेकर सिटी इंडिया न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *