गोंदिया: डुग्गीपार पोलिसांची मोठी कारवाई; २० लाख १० हजारांच्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपी निष्पन्न!
गोंदिया :
मुंबई सायबर सेलकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलिसांनी एका मोठ्या आर्थिक फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
बँक खात्याच्या ‘मनी ट्रेल’मुळे लागला सुगावा
मुंबई सायबर सेलने सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक प्रकरणांमधील पैशांच्या व्यवहारांचा (Money Trail) तपास केला. यादरम्यान बँक खात्यांचे तपशील आणि चेक/एटीएम विड्रॉलच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणातून धक्कादायक माहिती समोर आली. फसवणुकीची ही रक्कम डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘बँक ऑफ महाराष्ट्र, कोसमतोंडी’ शाखेतील एका खात्यात जमा झाली होती.
पोलिसांनी बँकेकडून अधिकृत माहिती गोळा केली असता, संबंधित खाते कुवरलाल येळे (रा. मुंडीपार/ईश्वर, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) याच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. तपासात असे आढळून आले की, १७ जुलै २०२६ रोजी या खात्यात तब्बल २०,१०,००० रुपये (वीस लाख दहा हजार रुपये) एवढी मोठी रक्कम फसवणूक करून जमा करण्यात आली होती.
या प्रकरणी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई मंगेश हेमराज डोंगरवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कुवरलाल येळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६१(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नसून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
पुढील तपास डुग्गीपार पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. अमिन नेवारे करत आहेत.
गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
