सत्यानिर्मिती महिला मंडळाचा शिक्षणव्रताचा आदर्श; गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक संच

सत्यानिर्मिती महिला मंडळाचा शिक्षणव्रताचा आदर्श; गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक संच

 

सौ. शबाना खान यांच्या नेतृत्वाखाली ‘बेटी पढाव, भविष्य बचाव’ अभियानातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार

 

उमरखेड : स्वातंत्र्य दिन सप्ताह व पैगंबर मोहम्मद जयंतीनिमित्त सत्यानिर्मिती महिला मंडळाच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील गरजू व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना निःशुल्क पुस्तक संच व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘बेटी पढाव, भविष्य बचाव’ अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

 

सत्यानिर्मिती महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. शबाना खान यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये हा आहे. विशेषतः नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून उपलब्ध न होणारे पुस्तक संच तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य मंडळामार्फत मोफत उपलब्ध करून दिले जाते.

 

उमरखेडमधून महाराष्ट्रभर पोहोचले शिक्षण अभियान

 

सत्यानिर्मिती महिला मंडळाने उमरखेड शहरातून सुरू केलेले हे कार्य आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांपर्यंत पोहोचले आहे. मंडळाच्या शाखांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर गरजू विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविले जाते. या अभियानाचा लाभ घेत आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यश संपादन केले आहे.

 

शिक्षणासोबतच मंडळ महिला सक्षमीकरणासाठीही सातत्याने कार्यरत आहे. घरेलू हिंसाचारग्रस्त महिलांना मदत, महिलांना रोजगाराच्या संधी, त्यांच्या हक्कांसाठी न्यायिक सहाय्य, तसेच महिला व बालकल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत मंडळाच्या शाखांसोबत समुपदेशन केंद्रे व शिवणकला केंद्रे कार्यरत आहेत.

 

विद्यार्थिनींनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे : सौ. शबाना खान

 

कार्यक्रमात सौ. शबाना खान यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मुलींनी आत्मविश्वासाने शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि आपल्या कुटुंबासह समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी सत्यानिर्मिती महिला मंडळ भविष्यातही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. जयश्री संतोष जैन होत्या, तर उद्घाटक म्हणून मा. उपाध्यक्ष तथा गटनेते नितीन माहेश्वरी उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे महत्त्व सांगून मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.

 

यावेळी डॉ. वंदना मर्सुळकर, सौ. सविता भागवत, सौ. सविता पवार, सौ. रेहाना सिद्दी, सौ. तबस्सुम सय्यदा, महेजबिन साजिद, रेहाना दादू, फर्झाना शेख यांच्यासह सत्यानिर्मिती महिला मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, विविध शाळांतील शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

. उमरखेड तालुका प्रतिनिधि बबलू उर्फ मोहम्मद शेख संपर्क क्रमांक. 9067934036

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *