माथनी-महादुला फाट्यादरम्यान ढाब्यांवर अवैध दारूविक्रीचा आरो

  1. माथनी-महादुला फाट्यादरम्यान ढाब्यांवर अवैध दारूविक्रीचा आरो

अवैध धंद्यांच्या तक्रारींकडे मौदा पोलिसांचे दुर्लक्ष? नागरिकांचा सवाल; तपासणी करून कारवाईची मागणी

मौदा : नागपूर-भंडारा महामार्गावरील माथनी ते महादुला फाट्यादरम्यान असलेल्या काही ढाब्यांवर अवैधरीत्या दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यासोबतच काही ठिकाणी विविध अवैध धंदे व गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. महामार्गालगत खुलेआम सुरू असल्याचे सांगितले जाणारे हे प्रकार प्रशासनाच्या कारवाईला आव्हान ठरत असल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे या प्रकारांकडे मौदा पोलिसांचे दुर्लक्ष आहे की कारवाईची प्रतीक्षा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

माथनी ते महादुला फाट्यापर्यंत नागपूर-भंडारा महामार्गावर अनेक ढाबे व हॉटेल्स आहेत. दिवसरात्र या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत काही ढाब्यांवर परवानगी नसताना दारूची विक्री होत असल्याच्या तक्रारी असल्याने संबंधित ठिकाणी पोलिसांनी अचानक तपासणी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. दारू सहज उपलब्ध होत असल्याने काही ठिकाणी मद्यपींची गर्दी होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

अवैध दारूविक्रीमुळे शासनाचा महसूल बुडण्याबरोबरच मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता असते. महामार्गावरील वाहनांची मोठी वर्दळ लक्षात घेता हा प्रकार अधिक गंभीर ठरू शकतो. त्यामुळे अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांसह संबंधित उत्पादन शुल्क विभागानेही संयुक्तपणे तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

याशिवाय काही ढाब्यांवर दारूविक्रीसह इतर अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, या तक्रारींची प्रशासनाकडून नेमकी कितपत दखल घेतली जाते, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ढाब्यांवर दारूविक्रीचा अधिकृत परवाना आहे किंवा नाही, याची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

माथनी ते महादुला फाट्यापर्यंतच्या सर्व ढाबे व हॉटेल्सची अचानक तपासणी करावी. अवैध दारूविक्री अथवा अन्य गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, या तक्रारींची मौदा पोलिस तसेच संबंधित प्रशासन कितपत गांभीर्याने दखल घेते आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. महामार्गावरील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त वाढवून संशयित ठिकाणांवर करडी नजर ठेवावी, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया

बिट जमादार धानला सर्कल यांना अवैध दारू विक्री चे विणा परवाना बाबत प्रतिक्रिया मागितली असता सदर तुम्ही मला दारूचे माहिती निर्गमित करा. कुटे चालू आहेत ते सांगा,आम्ही दररोज कारवाही करतोय.

(देवेंद्र भुरे) बिट जमादार धानला,

 

महादुला बोरगांव धाब्यांवर अवैध दारू विक्री होत असल्या बाबत प्रतिक्रिया मागितली असता कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया मिळाली नाही. (श्री.सरिन दुर्गे)पोलीस निरीक्षक मौदा.

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *