अभिजीत शहाणे खून प्रकरण : आरोपींना कठोर शिक्षा करा
मराठवाड्यातील सर्व सोनार बांधव व सराफा फेडरेशन व वसमत सराफ-सुवर्णकार असोसिएशनचे पोलीस निरीक्षकांकडे निवेदन; ४८ तासांत आरोपी जेरबंद केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन
वसमत : येथील सुवर्णकार कॉलनीतील तरुण अभिजीत रत्नाकर शहाणे (वय ३३) यांच्या खून प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी, तसेच तपासामध्ये भक्कम पुरावे संकलित करून दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणावे, अशी मागणी सराफा फेडरेशन महाराष्ट्र राज्य व वसमत सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या नेतृत्वाखाली वसमत पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास गतिमान करून अवघ्या ४८ तासांत तीन आरोपींना जेरबंद केले. यामध्ये रामेश्वर अडसूळ, गुलफाज पठाण आणि जय थोरात (सर्व रा. वसमत) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी अल्पावधीत आरोपींना ताब्यात घेतल्याबद्दल वसमत सराफ व सुवर्णकार असोसिएशन तसेच मराठवाड्यातील सोनार समाजाच्या वतीने वसमत पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले. तपासात पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
मात्र, आरोपींविरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेत ठोस पुरावे सादर होण्यासाठी तपास अत्यंत बारकाईने व निष्पक्षपणे करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. या प्रकरणातील सर्व संबंधित बाबींचा तपास करून उपलब्ध पुरावे संकलित करावेत आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
अभिजीत शहाणे हा मनमिळाऊ व होतकरू तरुण होता. त्याच्या हत्येच्या घटनेने शहाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे सुवर्णकार समाजात हळहळ व्यक्त होत आहे. अभिजीतच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी समाजबांधवांची भावना आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य सराफा फेडरेशनचे सचिव सुधाकरराव आण्णा धानोरकर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण सोनार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव मैड, वसमत सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कुलथे, तसेच सूर्यकांत टाक, प्रकाश कुलथे, गोविंददादा अंबिलवादे, अजयराव नागरे, सत्यनारायण उदावंत, संजय अंबिलवादे, नंदकुमार राजुरकर, सचिनशेठ बडवणकर, दिनेश डहाळे, मधुकर लोळगे, प्रदीप खेडकर, पांडुरंग लोळगे, आनंद डहाळे, अशोक डहाळे, संजू सेठ बोकन, मारोतराव शहाणे, नाना मैड, लक्ष्मीकांत टेहरे, मुन्ना टेहरे, भगवानराव मुंडीक, राजाभाऊ कंचले, गजानन महाले, संदेश टाक, विक्की दयाळ, संजू टाक ,रोहिदास बोकण, मदन पाथरकर, शेखर कुलथे, विजय कुलथे, सतीश कुलथे, सचिन दहिवाळ, प्रज्वल मुंडीक, प्रतीक कुलथे, गणेश खराटे, गणेश शहाणे, अक्षय शहाणे,कामेश बाच्चनवार आदींसह मराठवाड्यातील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
“पोलिसांनी ४८ तासांत आरोपींना जेरबंद करून केलेल्या तत्पर कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन. आता या प्रकरणाचा तपास भक्कम पुराव्यांच्या आधारे पूर्ण करून न्यायालयीन प्रक्रियेत दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी,” अशी मागणी यावेळी सराफा व सुवर्णकार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
अभिजीत शहाणे यांना न्याय मिळेपर्यंत कायदेशीर व लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी समाजबांधवांनी व्यक्त केला.
छाया नागेश चव्हाण
प्रतिनिधी सचिन घारपुरे
