गोंदिया एल.सी.बी.ची मोठी कारवाई; ५४ लाखांच्या मुद्देमालासह ३८ किलो गांजा जप्त
गोंदिया: राष्ट्रीय महामार्गावरून अवैधपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) गोंदियाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३८ किलो ५०० ग्रॅम गांजा, एक चारचाकी कार आणि ४ मोबाईल असा एकूण ५४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सोमवार, २४ मे २०२६ रोजी एल.सी.बी.चे पथक डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान, रायपूर (छत्तीसगड) कडून नागपूरच्या दिशेने एका काळ्या रंगाच्या महिंद्रा कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसी कारवाई आणि थरार
माहितीच्या आधारे पोलिसांनी सोंडड परिसरातील उड्डाणपुलाजवळ नाकाबंदी केली. संशयास्पद कार येताना दिसताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहून चालकाने कार उलट्या दिशेने पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून कार अडवली असता, त्यातील तीन जण जंगलाच्या दिशेने पळू लागले. पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
कारची झडती घेतली असता पोलिसांना खाकी रंगाच्या टेपने गुंडाळलेली ४० बंडल सापडली. यात एकूण ३८ किलो ५०० ग्रॅम गांजा (किंमत ३८,५०,००० रुपये) आढळून आला. यासोबतच १५ लाख रुपयांची महिंद्रा कार आणि ८० हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल फोन असा एकूण ५४,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेले आरोपी
१. विवेककुमार अश्विनीकुमार जोशी (२१ वर्षे, रा. डोंगरगड, छत्तीसगड)
२. एक विधीसंघर्ष बालक (रा. डोंगरगड, छत्तीसगड)
या प्रकरणातील तिसरा आरोपी सुफियानर उर्फ सोफी रजा (२८ वर्षे, रा. डोंगरगड) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुढील तपास
प्राथमिक चौकशीत हा गांजा नागपूर येथील सागर खोब्रागडे याला देण्यासाठी नेला जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
