कौसडीत गोवंश हत्या प्रकरणी बोरी पोलिसांची धडक कारवाई
गोपनीय माहितीच्या आधारे छापा; गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी मनोज टाक बोरी
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गोवंश हत्याबंदी कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या गोवंशाची हत्या करून मांस कापले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बोरी पोलिसांनी तातडीने धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. या कारवाईत अंदाजे 100 किलो गोवंश जातीचे मांस व इतर साहित्य असा एकूण ₹31,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेख मोइन अब्दुल करीम (वय 32) व शेख मोसीन अब्दुल करीम (वय 28), रा. चांभार गल्ली, कौसडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई प्रकाश लिंबाजी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बोरी येथे गुन्हा क्र. 220/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम, 1960 चे कलम 11, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, 1976 चे कलम 5(ब) व 9 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 चे कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 28 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता कौसडी येथील चांभार गल्ली परिसरातील राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. फिर्यादीनुसार, आरोपी गोवंश जातीचे मांस कापत असल्याचा आरोप आहे. कारवाईदरम्यान अंदाजे 100 किलो गोवंश जातीचे मांस (किंमत ₹30,000), मांस कापण्यासाठी वापरण्यात आलेले दोन सत्तूर, एक धारदार कुऱ्हाड आणि लाकडी खोड असा एकूण ₹31,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बीट जमादार राजेश जटाळे, पोलीस कर्मचारी अमोल मुंडे, प्रताप साळवणे, संघसेन कांबळे, प्रकाश मोरे आणि फरहीन रंगरेज यांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांच्या समन्वयातून आणि तातडीच्या कारवाईमुळे ही मोहीम यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही कौसडी परिसरात गोवंश संरक्षण कायद्यांतर्गत झालेल्या कारवायांमध्ये बीट जमादार राजेश जटाळे यांनी सक्रिय भूमिका बजावली असल्याने त्यांच्या कामाची परिसरात चर्चा आहे.
या कारवाईमुळे कौसडी व परिसरात खळबळ उडाली असून गोवंश हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांविरोधात बोरी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचा संदेश गेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रताप साळवणे करीत आहेत.
