चारगाव शिवारात दुचाकीवरून अवैध दारूची तस्करी; ४५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह एकावर गुन्हा दाखल

चारगाव शिवारात दुचाकीवरून अवैध दारूची तस्करी; ४५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह एकावर गुन्हा दाखल

 

 

स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण व खापा पोलिसांची संयुक्त कारवाई; ५० लिटर मोहाची दारू जप्त

 

खापा

चारगाव शिवारात नाकाबंदी दरम्यान दुचाकीवरून बेकायदेशीररीत्या मोहाफुलाच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमावर खापा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांच्या पथकाने ही कारवाई करून ५० लिटर मोहाची दारू आणि दुचाकी असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, एका दुचाकी वाहनावरून अवैध रीतीने मोहाफुलाच्या दारूची वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने मौजा चारगाव येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी सुरू असताना संशयित बजाज डिस्कवर दुचाकी (क्रमांक: एम.एच.-४०/ए.जी.-८०९०) येताना दिसली.

पोलिसांनी सदर दुचाकी थांबवून पंचांसमक्ष तिची तपासणी केली असता, त्या वाहनावर विनापरवाना मोहाफुलाची दारू आढळून आली. या प्रकरणी आरोपी मनोज देवेंद्र प्रजापती (वय ४० वर्षे, रा. बडेगाव, ता. सावनेर, जि. नागपूर) हा अवैध दारूची वाहतूक करताना मिळून आला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ५ हजार रुपये किमतीची ५० लिटर मोहाफुलाची दारू आणि ४० हजार रुपये किमतीची बजाज डिस्कवर दुचाकी, असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर आरोपीविरुद्ध खापा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *