शेतकरी मरतोय, प्रशासन झोपेत? वाघनाथच्या घटनेने पुन्हा उघड केली वास्तवाची जखम

शेतकरी मरतोय, प्रशासन झोपेत? वाघनाथच्या घटनेने पुन्हा उघड केली वास्तवाची जखम

 

 

यवतमाळ

प्रतिनिधी एस के शब्बीर

 

 

महागाव तालुक्यातील वाघनाथ येथील ४० वर्षीय शेतकरी भगवान देवराव भाकरे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण तालुका हादरला आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण तपासातून समोर येईलच, मात्र या घटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

महागाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर” सारखे उपक्रम राबविण्यात आले. बैठका झाल्या, भाषणे झाली, आश्वासने देण्यात आली; परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या आयुष्यात किती बदल झाला, हा खरा प्रश्न आहे. अनेक शेतकरी आजही महसूल, पीकविमा, कर्ज, जमीन, सातबारा, सिंचन पांदण रस्ते आणि इतर मूलभूत प्रश्नांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. मस्के तहसीलदार शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्यास असमर्थ

आजही अनेक ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना न्यायासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषणाची नोटीस द्यावी लागते, वारंवार चकरा माराव्या लागतात, ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. जर समस्या वेळेत सोडवल्या गेल्या असत्या, तर लोकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची वेळ आली असती का?

तालुक्यात यापूर्वीही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. दहिसावळी, महागाव पिंपरी शिवा र, घाणमुख , या गावातील शेतकऱ्यांनी का आत्महत्या केल्या प्रत्येक घटनेनंतर शोकसभा, सांत्वन आणि बैठका होतात; मात्र शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत, याचे उत्तर कोण देणार? शेतकऱ्यांना दिलासा देणारी यंत्रणा कागदावरच मर्यादित राहिली आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संबंधित विभागांनी या घटनांकडे केवळ आकडेवारी म्हणून न पाहता वास्तव समजून घेण्याची गरज आहे. शेतकरी हा केवळ मतदार नाही, तर देशाचा अन्नदाता आहे. त्याच्या समस्या वेळेत सोडवल्या नाहीत, तर अशा दुर्दैवी घटनांनंतर व्यक्त होणारी हळहळ आणि संवेदना निरर्थक ठरणार आहेत.

वाघनाथ येथील घटना ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वेदनांकडे गांभीर्याने पाहण्याचा इशारा आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का, हा प्रश्न तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *