मीटरच्या विरोधात मा.आ.विजय भांबळे सरसावले

मीटरच्या विरोधात मा.आ.विजय भांबळे सरसावले

 

स्मार्ट मिटर बसविण्यापूर्वी ग्राहकांची संमती घ्या;

 

अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा.

 

माजी आमदार विजय भांबळे यांचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन; ग्राहकांच्या हितासाठी पारदर्शक प्रक्रिया राबविण्याची मागणी

 

जिंतूर | प्रतिनिधी: मनोज टाक

 

:महावितरणकडून राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला विरोध वाढत असताना, जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी महावितरणच्या परभणी परिमंडळाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन सादर करून ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, राज्यभर स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांकडून जास्त वीजबिल येण्याची भीती व्यक्त केली जात असून, स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी महावितरणने स्पष्ट व लोकाभिमुख भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

माजी आमदार विजय भांबळे यांनी निवेदनाद्वारे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी संबंधित ग्राहकांची लेखी संमती घेणे, मीटर बदलण्यापूर्वी लेखी अथवा एसएमएसद्वारे पूर्वसूचना देणे, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही याची लेखी हमी देणे, तसेच स्मार्ट मीटरचे रीडिंग, बिलिंग आणि तांत्रिक बाबींविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबविणे यांचा समावेश आहे.

 

याशिवाय, चुकीचे अथवा वादग्रस्त वीजबिल आल्यास स्वतंत्र व जलद तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, मीटर बदलताना जुन्या व नव्या मीटरचे रीडिंग ग्राहकांना लेखी स्वरूपात द्यावे आणि न्यायालयीन प्रक्रियेचा अंतिम निर्णय होईपर्यंत ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

या निवेदनावर विविध नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात

 

आल्या असून, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महावितरणने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.या वेळी मा.आ. विजय भांबळे यांच्यासह लक्ष्मण दादा बुधवंत,शंकर मामा जाधव,बोरी माजी जि.प.उपाध्क्ष अजय भैया चौधरी,विश्वनाथ राठोड, मुरलीधर मते,बाळासाहेब भांबळे,अविनाश माने,मनोहर डोईफोडे, ज्ञानेश्वर काळे,सादेक कुरेशी, राजेश चव्हाण, ज्ञानेश्वर घुगे,दत्तात्रय गाडेकर,ज्ञानेश्वर पालवे आदींसह बहुसंख्य प्रमाणात पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह ग्राहकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर उप होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *