शिवाजी महाविद्यालयात पदवीदान कार्यक्रम संपन्न

शिवाजी महाविद्यालयात पदवीदान कार्यक्रम संपन्न

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

हिंगोली – येथील शिवाजी महाविद्यालयात दिनांक 21 ऑगस्ट शुक्रवार रोजी परीक्षा विभाग, विद्यार्थी विकास विभाग व गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बी.ए., बी. कॉम. या शाखेच्या विद्यार्थ्यांच्या मान्य झालेल्या पदव्यांचे वितरण, करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, माजी शिक्षणाधिकारी मा. शिवाजीराव पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक श्री. योगानंद स्वामी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील, तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी.जी. गायकवाड, उपप्राचार्य डॉ . क्षीरसागर बी.एस. उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यावेळी प्राचार्य नागनाथ पाटील म्हणाले की, सध्याचा काळ हा अवघड आहे. आदर्श नेमका कोणाचा ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी स्वतः विचार केला पाहिजे. त्यानूसार आचरण केले पाहिजे. रिल म्हणजे रियल लाईफ नाही याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. चांगले काय? वाईट काय? हे आपल्याला शिक्षण शिकवते. त्याचा अवलंब आपण जीवन जगताना केला पाहिजे. निव्वळ नशिबावर अवलंबून राहू नका. स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवा. तसेच अंधाराला चिरून प्रकाशाचा शोध घ्या आणि स्वतःची इच्छाशक्ती प्रबळ ठेवा असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रल्हाद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी प्राचार्य बी.जी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी असलेली नाळ कायम ठेवावी असे सांगितले, तसेच एक संवेदनशील नागरिक म्हणून समाजामध्ये वावरण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या काळात आव्हाने खूप आहेत पण त्यातून विद्यार्थ्यांनी संधी शोधली पाहिजे, पदवीच्या नंतर विद्यार्थ्यांना बऱ्याच संधी उपलब्ध आहेत त्याचा आपल्या भावी आयुष्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे असे सांगितले, तसेच आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यात चा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रामदास मुक्टे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक धाराशिव शिराळे यांनी केले तर आभार डॉ. सुनील कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा विभाग प्रमुख डॉ. मनीषा गवळी तसेच विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. सुनील कांबळे, गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. सुभाष शेरकर, डॉ. संगीता मुंढे, डॉ. सुनंदा भुसारे, डॉ. गुणाजी नलगे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने पदवी प्राप्त विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *