*सावनेर व कळमेश्वर येथे भव्य शेतकरी कर्जमुक्ती मेळावा उत्साहात संपन्न*
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकाराने सावनेर व कळमेश्वर येथे भव्य शेतकरी कर्जमुक्ती मेळावा उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाला दोन्ही तालुक्यांतील शेतकरी, नागरिक आणि लाभार्थ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
ते म्हणाले की, या योजनेसाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असून १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत सहकारी, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व खासगी बँकांकडून घेतलेल्या पात्र पीक कर्जाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतची थकबाकीही ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आमदार डॉ. देशमुख यांनी पुढे सांगितले की, पूर्वीच्या अनेक जाचक अटी शिथिल करण्यात आल्या असून जमीनधारणेची कमाल मर्यादाही लागू राहणार नाही. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३० जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयाचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा, यासाठीच या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. म्हूणन आमदार या नात्याने मुख्यमंत्री साहेबाना भेटून सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली होती. आता फडणवीस साहेबांनी विनाअट २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती केली. यामुळे नक्कीच आत्महत्या थांबविण्यास व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. आणखी एक महत्वाचे म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वत्र रक्तदान करण्यात करण्यात येत आहे, त्याचा देखील एक नवीन उच्चाक होईल. २०१४ पासून ही फडणवीस साहेबांनी केलेली दुसरी कर्जमाफी आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण जुने थकीत विजबिल माफ केले, आणि आता शेतकऱ्यांना मोफत विज मिळत आहे. PM किसान योजना द्वारे ६००० रुपये मिळतात आता मुख्यमंत्री फडणवीस सरकार सुद्धा ६००० रुपये देत आहे. लाडली बहीण योजनेद्वारे १५०० रुपये मिळत आहेत. आम्ही लवकरच २१०० रुपये करू. ग्रामीण भागात भेदभाव न करता ग्रामीण विकास झपाट्याने होत आहे. येणाऱ्या ४ वर्षात सावनेर-कळमेश्वर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता करून देऊ. लिंगा येथील कोलगॅसीफिकेशन च्या ७० हजार कोटीच्या प्रकल्पामुळे ३० हजार लोकांना रोजगार मिळणार. काही लोकांनी जिल्हा बँक बरबाद केली, त्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी हानी झाली. पण त्याचादेखील हिशोब होणार आणि त्यांच्याकडून वसुली करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे सुरक्षित परत मिळणार, असे ते म्हणाले.
नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य डॉ राजीव पोतदार यांनी सुद्धा यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
मेळाव्यात उपस्थित शेतकरी व नागरिकांनी राज्य शासनाच्या शेतकरी हिताच्या निर्णयांचे स्वागत करत आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
