‘मिशन ऊर्जा’मध्ये भारतीय विद्या मंदिरचे विद्यार्थी ठरले अव्वल; २० पैकी तब्बल ९ पारितोषिकांवर मोहोर
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली जिल्हा पोलिस दल आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ऊर्जा’ हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. महिला सुरक्षा, रस्ते सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि अमली पदार्थांपासून सुरक्षा या चार विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्था संचलित श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय, हिंगोलीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत तब्बल ९ पारितोषिके पटकावली.
स्पर्धेतील चारही विषयांसाठी प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण २० पारितोषिके जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी एकट्या दराडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ९ पारितोषिके मिळविल्याने एकूण पारितोषिकांपैकी जवळपास निम्म्या पारितोषिकांवर या विद्यालयाने आपला ठसा उमटविला आहे.
महिला सुरक्षा विषयात कु. समृद्धी नरसिंग बासटवार हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर सायबर सुरक्षा विषयात कु. आराध्या संतोष महामुने हिने प्रथम क्रमांक पटकावला. महिला सुरक्षा विषयात कु. तनिष्का अतुल अंबरकर, सायबर सुरक्षा विषयात कु. अक्षरा वैजनाथ पोले आणि अमली पदार्थांपासून सुरक्षा विषयात शेख दानिश शे. इस्माईल यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
याशिवाय सायबर सुरक्षा विषयात कु. सृष्टी हरिदास वायचाळ हिने तृतीय क्रमांक मिळविला. रस्ते सुरक्षा विषयात कु. कनिष्का अरुण चोंढेकर, तसेच अन्य दोन विषयांत कु. अनुसया अनिल मुंढे आणि कु. तेजस्विनी अक्षुत सोनोने यांनी चतुर्थ क्रमांक पटकावून विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.
या यशासाठी कला अध्यापक श्री. रवींद्र जांभळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा व कला अध्यापकांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा हिंगोली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश अंभोरे आणि उपमुख्याध्यापक अनिल लोळेवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. मदन मार्डीकर, सचिव ॲड. गयबाराव नाईक तसेच सर्व सन्माननीय संचालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘मिशन ऊर्जा’च्या जनजागृती संदेशाला कलात्मक अभिव्यक्ती देत दराडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश विद्यालयाच्या शैक्षणिक तसेच कलात्मक गुणवत्तेचे प्रभावी द्योतक ठरले आहे.
